CJP संसद मोर्चाप्रकरणी 10 गुन्हे दाखल; दिल्लीत सुरक्षा वाढली, 2 हजार CRPF जवान तैनात
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनादरम्यान 20 जुलै रोजी संसदेकडे काढण्यात
आलेल्या मोर्चाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोर्चादरम्यान
झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एकूण 10 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलकांवर पोलिस कर्मचारी आणि दंगल
नियंत्रण पथकावर हल्ला करणे, दगडफेक, सार्वजनिक
मालमत्तेचे नुकसान करणे तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे आरोप ठेवण्यात
आले आहेत. या प्रकरणातील चार गुन्हे संसद मार्ग पोलीस ठाण्यात, तीन गुन्हे कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात, तर मंदिर
मार्ग, बाराखंबा रोड आणि कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात प्रत्येकी
एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक
पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि सुरू
असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत
करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार सीआरपीएफच्या 20
अतिरिक्त तुकड्या, म्हणजेच सुमारे 2
हजार जवान, पश्चिम बंगालमधून विशेष
विमानांद्वारे दिल्लीत रवाना करण्यात आले आहेत. यापूर्वीही दिल्ली पोलिसांच्या
मदतीसाठी सीआरपीएफ आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या अनेक
तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. संसद परिसर, जंतर-मंतर
आणि इतर संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून,
कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.