राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद परिसरात काळ्या कपड्यांत विरोधकांचे आंदोलन; प्रणिती शिंदेंसह खासदारांचा सहभाग

नवी दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरील कथित दडपशाहीच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन परिसरात काळे कपडे परिधान करून आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे तसेच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचे अनेक खासदार सहभागी झाले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे कथित चुकीचे हाताळणी, आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही आणि लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या संरक्षणासाठी आणि आंदोलनाशी संबंधित घटनांवर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणात उत्तर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.