धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोलापुरात DYFIचे २४ तासांचे अन्नत्याग आंदोलन
सोलापूर, दि. १७ जुलै : केंद्रीय शिक्षणमंत्री
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम
वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा
महासंघ (DYFI) सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने २४ तासांचे
अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुनम गेट,
जिल्हा परिषद परिसर येथे आज (१७ जुलै) सकाळी १० वाजल्यापासून हे
आंदोलन सुरू झाले. जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी आणि राज्य सचिव दत्ता चव्हाण
यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.
यावेळी जिल्हा सचिव ॲड. अनिल वासम यांनी सांगितले की, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या
पदाचा राजीनामा द्यावा. प्रशासनाने २४ तासांत या मागणीची दखल घेतली नाही, तर आंदोलन अखंडित स्वरूपात सुरू ठेवण्यात येईल, असा
इशाराही त्यांनी दिला. या अन्नत्याग आंदोलनात जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी,
जिल्हा सचिव ॲड. अनिल वासम, राज्य सचिव दत्ता
चव्हाण, जिल्हा सहसचिव विजय हरसुरे आणि ज्येष्ठ कार्यकर्ते
सनी शेट्टी सहभागी झाले आहेत. यावेळी नरेश गुल्लापल्ली, अमित
मंचले, योगेश आकिम, दिनेश बडगु,
आप्पाशा चांगले, राहुल बुगले, सनी आमाटी, कुमार येलगेटी, राधागोपाल
बंडी, शशिकांत गुंडला, अजय भंडारी,
अबू हुरेरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. DYFIच्या
वतीने केंद्र सरकारने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन लोकशाही मार्गाने मांडण्यात
आलेल्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी
मागणी करण्यात आली.