देशातील पहिला निर्णय! E20 पेट्रोलमुळे कारचे नुकसान; ग्राहकाच्या बाजूने निकाल, कंपनीला नवी कार देण्याचे आदेश

रायपूर : E20 इंधनामुळे वाहनाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या प्रकरणात छत्तीसगडमधील रायपूर जिल्हा ग्राहक न्यायालयाने ग्राहकाच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. भारतातील E20 इंधनाशी संबंधित वादावर ग्राहकाच्या बाजूने आलेला हा पहिलाच महत्त्वाचा न्यायालयीन निकाल मानला जात आहे. तक्रारदाराने प्रसिद्ध वाहन उत्पादक मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, E20 इंधनाचा वापर सुरू केल्यानंतर वाहनाच्या इंजिनमध्ये वारंवार बिघाड, मिसफायरिंग, मायलेजमध्ये घट आणि कार्यक्षमतेत कमी झाल्याचा आरोप करण्यात आला. अनेकदा दुरुस्ती करूनही समस्या कायम राहिल्याचे ग्राहकाने न्यायालयात सांगितले.

सुनावणीदरम्यान वाहन कंपनी आणि डीलरने संबंधित मॉडेल E20 इंधनासाठी सक्षम असल्याचा दावा केला. तसेच वाहनातील बिघाड हा देखभालीतील त्रुटी आणि सामान्य झिजेमुळे झाल्याचेही म्हटले. मात्र, ग्राहकाने सादर केलेल्या पुराव्यांमध्ये इंजिनमध्ये E20 इंधनाचे अवशेष आणि इंधन टाकीत पांढरा चिकट पदार्थ आढळल्याचे नमूद करण्यात आले.

पुरावे आणि युक्तिवादांचा विचार करून ग्राहक न्यायालयाने कंपनीला ४५ दिवसांच्या आत तक्रारदाराला त्याच मॉडेलची नवीन E20-सुसंगत कार देण्याचे आदेश दिले. तसे न झाल्यास कारची संपूर्ण किंमत २०.५० लाख रुपये परत करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याशिवाय, मानसिक त्रासासाठी १ लाख रुपये आणि न्यायालयीन खर्चापोटी १० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचेही आदेश कंपनीला देण्यात आले आहेत.