रावे कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन - लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या रावे विद्यार्थिनींकडून मोरवंची येथे एसएमएस व्याख्यानांचे आयोजन

मोरवंची (ता. मोहोळ, जि. सोलापूर) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळाच्या  कृषिकन्यानी कौतुकास्पद लक्षणीय उपक्रमः हाती घेतला आहे. लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा, सोलापूर येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) व कृषी औद्योगिक संलग्नता (AIA) अंतर्गत मोरवंची गावात शेतकऱ्यांसाठी विशेष एसएमएस (Subject Matter Specialist) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रावे विद्यार्थिनींनी केले असून गावातील शेतकरी, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारचे शेतकरी-केंद्रित प्रशिक्षण हे RAWE कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.  या   कार्यक्रमात डॉ. व्ही. टी. दावणे यांनी "आजची डिजिटल शेती, उद्याची समृद्धी" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी डिजिटल कृषीचे महत्त्व सांगताना मोबाईल ॲप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हवामान अंदाज, मृदा आरोग्य पत्रिका, ई-नाम, ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल कृषी सेवा तसेच विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेती अधिक कार्यक्षम, शाश्वत व नफ्याची होऊ शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले. 

                             त्यानंतर प्रा. उज्वला नेताजी कोंडूभैरी यांनी "माती परीक्षण : काळाची गरज" या विषयावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, माती नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत, परीक्षण अहवालाचे वाचन तसेच त्यानुसार संतुलित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढ, जमिनीची सुपीकता टिकविणे आणि अनावश्यक खत खर्च टाळणे शक्य असल्याचे सांगितले. प्रत्येक शेतकऱ्याने नियमित माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.  या  कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांशी संवाद साधला. रावे विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे नियोजन, शेतकरी संपर्क व आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. उपस्थित ग्रामस्थांनी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करून अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.तसेच या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, रावे कार्यक्रम समन्वयक अधिकारी डॉ. दावणे व्ही. टी., विषय शिक्षक डॉ. परशुराम कांबळे  यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.  

                            मोरवंची  गावातील कृषिकन्या  साक्षी काळे, सायली दराडे , स्मिता बिरादार, घोळवे सुहानी, श्रावणी आचार्य  यांनी मोलाचे मार्गदर्शन करून या उपक्रमास साक्रिय सहभाग दिला.