पासपोर्ट, आधार किंवा मतदार ओळखपत्र नाही; भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? जाणून घ्या कायदा काय सांगतो

भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नेमका कोणता, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पासपोर्ट सेवा दिनानिमित्त बोलताना भारतीय पासपोर्ट हा केवळ प्रवासासाठीचा दस्तऐवज असून तो नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नसल्याचे स्पष्ट केले. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.

भारतात अनेकजण पासपोर्ट, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यांनाच नागरिकत्वाचा पुरावा मानतात. मात्र कायदेशीरदृष्ट्या ही कागदपत्रे ओळख आणि पत्ता सिद्ध करण्यासाठी उपयुक्त असली तरी ती नागरिकत्वाचा अंतिम पुरावा मानली जात नाहीत.

पासपोर्ट कायदा काय सांगतो?

पासपोर्ट कायदा १९६७ च्या कलम २० नुसार, विशेष परिस्थितीत केंद्र सरकार भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तीलाही पासपोर्ट किंवा प्रवास दस्तऐवज जारी करू शकते. त्यामुळे पासपोर्ट आणि नागरिकत्व या दोन स्वतंत्र बाबी असल्याचे कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मुंबई उच्च न्यायालयाने २०१३ मधील एका निर्णयात पासपोर्ट असणे म्हणजे संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचा अंतिम पुरावा ठरत नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे पासपोर्टला नागरिकत्वाचा निश्चित आणि अंतिम पुरावा मानता येत नाही.

भारतीय नागरिकत्व कसे मिळते?

भारतीय नागरिकत्व कायदा, १९५५ नुसार नागरिकत्व खालील मार्गांनी मिळू शकते:

  • जन्माच्या आधारे
  • वंशपरंपरेने (Descent)
  • नोंदणीद्वारे (Registration)
  • नैसर्गिकरणाद्वारे (Naturalization)
  • भारतात नवीन प्रदेश विलीन झाल्यास

जन्मावर आधारित नियम

  • २६ जानेवारी १९५० ते १ जुलै १९८७ दरम्यान भारतात जन्मलेल्या व्यक्तींना थेट नागरिकत्व.
  • १९८७ ते २००३ दरम्यान एका पालकाकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक.
  • २००३ नंतर दोन्ही पालक भारतीय नागरिक असणे किंवा एक पालक भारतीय नागरिक आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसणे आवश्यक.

नागरिकत्वाचा खरा कायदेशीर पुरावा कोणता?

कायद्यानुसार नागरिकत्व प्रक्रियेनंतर केंद्र सरकारकडून जारी केले जाणारे नागरिकत्व प्रमाणपत्र (Citizenship Certificate) हे भारतीय नागरिकत्वाचे औपचारिक आणि कायदेशीर प्रमाणपत्र मानले जाते. हेच नागरिकत्व सिद्ध करणारे सर्वात अधिकृत दस्तऐवज आहे.

एका नजरेत महत्त्वाची माहिती

  • पासपोर्ट हा प्रवास दस्तऐवज आहे.
  • आधार कार्ड हे ओळख व पत्ता सिद्ध करणारे दस्तऐवज आहे.
  • मतदार ओळखपत्र मतदानासाठी पात्रता दर्शवते.
  • पॅन कार्ड करसंबंधित ओळखपत्र आहे.
  • नागरिकत्वाचा अधिकृत पुरावा म्हणजे नागरिकत्व कायदा १९५५ अंतर्गत जारी केलेले नागरिकत्व प्रमाणपत्र.