तुकाराम मुंढे यांचा धडाका! सोलापुरातील डेअरीवर FDAचा छापा; 511 किलो भेसळयुक्त बर्फी नष्ट, लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथील रामदेव डेअरीवर छापा टाकण्यात आला.

तपासणीदरम्यान संबंधित डेअरी कोणताही अधिकृत परवाना न घेता सुरू असल्याचे उघड झाले. शुद्ध दूध किंवा खव्याऐवजी दुधातील स्निग्धांश (फॅट) काढून उरलेल्या पदार्थात वनस्पती तूप मिसळून अजमेरी बर्फी आणि स्वीट बर्फी तयार केली जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या कारवाईत 163 किलो अजमेरी बर्फी आणि 348 किलो स्वीट बर्फी असा एकूण 511 किलो भेसळयुक्त बर्फीचा साठा नष्ट करण्यात आला. तसेच बनावट मिठाई तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी स्किम्ड मिल्क पावडर, वनस्पती तूप आणि इतर साहित्यांसह एकूण 1,807 किलो वजनाचा व सुमारे 6 लाख 91 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी आणि रेणुका पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या बर्फीचे चार नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर भेसळीचे स्वरूप आणि आरोग्यावर होणारे परिणाम स्पष्ट होणार आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात राज्यभर धडक कारवाया सुरू ठेवल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मिठाई उत्पादक, हॉटेल चालक आणि इतर खाद्य व्यवसायिकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.