लग्नाच्या दोन महिन्यांत संसार उद्ध्वस्त; पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या त्रासातून तरुणाची आत्महत्या, दोघांविरुद्ध गुन्हा

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यांत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे आणि त्यातून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत तरुणाचे नाव संजय राजाराम राऊत (वय 26, रा. यावली, ता. मोहोळ) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयचा विवाह दोन महिन्यांपूर्वी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच पत्नीचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती त्याला मिळाल्याने पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले होते.

मृताच्या वडिलांनी मोहोळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, पत्नी आणि तिचा कथित प्रियकर सौरभ शिंदे (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) यांनी संजयला मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या त्रासाला कंटाळून संजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या आधारे मोहोळ पोलिसांनी संजयची पत्नी आणि सौरभ शिंदे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत.