सिंधूचे पाणी पाकिस्तानला मिळू देणार नाही; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा थेट इशारा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा
कडक शब्दांत इशारा दिला आहे. तेलंगणा भाजपच्या वतीने हैदराबाद येथे आयोजित
कार्यक्रमात बोलताना त्यांनी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानपर्यंत सिंधू
नदीचे पाणी कोणत्याही परिस्थितीत पोहोचू दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
“दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि मानवतेच्या शत्रूंपर्यंत सिंधू नदीचे पाणी आम्ही पोहोचू देणार नाही. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,” असे ठाम वक्तव्य त्यांनी केले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानसह विरोधकांवरही निशाणा साधला.
यावेळी त्यांनी भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत सांगितले की, “शांततेची भाषा न समजणाऱ्यांना त्यांच्या भाषेत उत्तर कसे द्यायचे हे भारताला चांगलेच ठाऊक आहे. ऑपरेशन सिंदूरमधून भारताने संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे.” सिंधू जल कराराबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला कायमस्वरूपी पाठिंबा देणे बंद करत नाही, तोपर्यंत भारताची भूमिका कठोरच राहील. राजनाथ सिंह यांनी भारताच्या जागतिक भूमिकेवरही भाष्य केले. कोरोनाकाळात भारताने अनेक देशांना मदत केल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, आज भारत जगाचा विश्वासार्ह मित्र बनला आहे. मात्र शत्रूंनी हे विसरू नये की, “भारताकडे जगाला वाचवण्यासाठी लस आहे आणि शत्रूंचा थरकाप उडवण्यासाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्रही सज्ज आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध आणि सिंधू जल कराराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.