मामाकडे सुट्टीसाठी आलेल्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

सोलापूर :- शाळेच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मामाकडे आलेल्या एका १० वर्षीय मुलीचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आराध्या विजय मोहिते (वय १०, रा. कडेगाव, जि. सांगली) असे मृत मुलीचे नाव आहे. शाळेला सुट्टी असल्याने आराध्या आपल्या मामाकडे समाधान नगर परिसरात राहण्यासाठी आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी घराबाहेर खेळत असताना तिच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असतानाच आराध्याची प्रकृती खालावत गेली. अखेर उपचारादरम्यान रविवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्पदंशाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.