प्रेमविवाहाचा थरारक शेवट; बार्शीत पतीकडून पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ सोमवारी सकाळी घडलेल्या एका
धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. बार्शी-परंडा मार्गावर ऋषिकेश पाटील याने
पत्नी धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने निर्घृण हत्या केली. पत्नीची हत्या
केल्यानंतर आरोपी पती स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. प्राथमिक
माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये मागील काही
दिवसांपासून वाद सुरू होते. दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याची माहिती
समोर आली असून, याआधीही पत्नीला मारहाण झाल्याची चर्चा आहे. धनश्री
पाटील या बँक मॅनेजर पदावर कार्यरत होत्या, तर आरोपी ऋषिकेश
पाटील हाही वित्त क्षेत्रातील अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. काही
महिन्यांपूर्वीच दोघांनी प्रेमविवाह केला होता. सोमवारी सकाळी धनश्री या
नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाल्या असताना बार्शी-परंडा मार्गावर ऋषिकेशने
त्यांना अडवले. संतापाच्या भरात त्याने पत्नीवर चाकूने सुमारे ५० वार केले.
त्यानंतर गळा चिरून तिची हत्या केली. ही घटना भररस्त्यात घडल्याने परिसरात मोठी खळबळ
उडाली. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला,
मात्र संतप्त अवस्थेतील आरोपीने त्यांनाही धमकावत मागे हटवले. गंभीर
जखमी झालेल्या धनश्री यांनी घटनास्थळीच प्राण सोडले. या प्रकरणामुळे बार्शीसह
संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. बार्शी ग्रामीण पोलिसांकडून पुढील
तपास सुरू असून दिवसभर गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू होती.