संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये भक्तिमय आषाढी दिंडी; विद्यार्थ्यांनी जपली वारकरी परंपरा

सात रस्ता परिसरातील संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वारकरी संप्रदायाची भक्ती, संस्कार आणि परंपरा यांचे सुंदर दर्शन घडले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पालखी पूजनाने झाली. शाळेचे प्राचार्य तोजी जोस यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. आपल्या मनोगतात त्यांनी, "विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती, परंपरा आणि संतांच्या विचारांची ओळख करून देणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे," असे सांगितले. याप्रसंगी सौ. जयश्री खुने यांनी आषाढी वारीचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे मा. नागनाथ पाटील (निवृत्त पोलीस उपनिरीक्षक) यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत पंढरपूर वारीचे महात्म्य, वारकरी परंपरेचे महत्त्व आणि भारतीय संस्कृती जपण्याची गरज यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, तबला आदी पारंपरिक वाद्यांच्या साथीने विठ्ठलभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. संत आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य तसेच समाजप्रबोधनाचा संदेश देणारे भारूड उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले. यानंतर संगमेश्वर पब्लिक स्कूल ते दंडवते दत्त मंदिर अशी विद्यार्थ्यांची पायी दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली. हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल नामस्मरणात निघालेल्या या दिंडीमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

या सोहळ्यास संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या मा. शितल काडादी, शाळेचे प्राचार्य तोजी जोस, पूर्व-प्राथमिक विभागाच्या समन्वयक सौ. वीणा अन्नलदास, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. उषा लोकरे यांनी करून दिला, तर मा. शितल काडादी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लक्ष्मी मल्लाडे यांनी केले, तर सौ. सुप्रिया परचंडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संगीत शिक्षक श्री. अक्षय भडंगे यांनी संगीताचे मार्गदर्शन, तर नृत्य शिक्षिका सौ. प्राची बऱ्हाणपुरे यांनी विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण कार्यक्रम भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम ठरला. या उपक्रमाचे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. धर्मराज काडादी, काडादी परिवारातील सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच उपस्थित पालकांनी मनापासून कौतुक करत सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.