आयटी पार्कसाठी होटगीतील २० हेक्टर जमीन एमआयडीसीला; मुख्यमंत्र्यांकडून सोलापूरला वाढदिवसाचे 'रिटर्न गिफ्ट'
सोलापूर:- सोलापूरच्या बहुप्रतीक्षित आयटी पार्क प्रकल्पाला मोठा
दिलासा मिळाला असून, होटगी येथील पाटबंधारे विभागाची २०
हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) विनामोबदला
हस्तांतरित करण्याचे आदेश बुधवारी जारी करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने
आमदार देवेंद्र कोठे यांनी या विषयासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मुंबईतील
विविध बैठकींमध्येही आमदार कोठे यांनी आयटी पार्कचा मुद्दा उपस्थित केला होता.
या निर्णयानुसार होटगी येथील लघु पाटबंधारे तलावाच्या गट
क्रमांक ५७६ मधील २० हेक्टर जागा आयटी पार्कसाठी एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याची
प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्याबाबतचे पत्र जलसंपदा विभागाने
एमआयडीसीला पाठवले आहे. ही जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया अनेक दिवसांपासून प्रलंबित
होती. त्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडेही पाठपुरावा
करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा
आदेश जारी झाल्याने याला सोलापूरकरांसाठी "रिटर्न गिफ्ट" म्हणूनही
पाहिले जात आहे. या निर्णयामुळे होटगी येथे आयटी पार्क उभारणी निश्चित झाली असून,
सोलापूरातील उच्चशिक्षित तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या
नव्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
वाढदिवसानिमित्त सोलापूरकरांना दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे. आयटी पार्कमुळे
शहरातील उच्चशिक्षित तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध
होतील."
— आमदार देवेंद्र कोठे