दिल्ली लाठीचार्जवर मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका; पोलिसांच्या कारवाईचे समर्थन, आंदोलनात अराजकवादी घुसल्याचा आरोप
नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात
झालेल्या CJPच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या
लाठीचार्जवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट
केली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करत, परिस्थिती
नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. मुख्यमंत्री
फडणवीस म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन
करण्याचा अधिकार आहे. मात्र, संविधानाने दिलेल्या
अधिकारांसोबतच जबाबदाऱ्यांचेही पालन करणे आवश्यक आहे. परवानगी घेऊन आणि शांततेत
आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळते. मात्र, विनापरवानगी
आंदोलन, हिंसाचार किंवा राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा
प्रयत्न झाल्यास कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील आंदोलनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, पोलिसांनी मोठा संयम दाखवला. योग्य वेळी परिस्थिती नियंत्रणात आणली नसती,
तर अधिक गंभीर घटना घडू शकल्या असत्या. कोणत्याही सरकारला आपल्या
नागरिकांवर लाठीचार्ज करणे आवडत नाही, मात्र कायदा आणि
सुव्यवस्था राखण्यासाठी काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी आंदोलनात काही अराजकवादी
प्रवृत्ती शिरल्याचा आरोपही केला. त्यांच्या मते, आंदोलनाला
स्पष्ट नेतृत्व नसल्यामुळे काही असंबंधित संघटना आणि राजकीय घटकांनी परिस्थितीचा
फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड, दगडफेक
यांसारख्या घटना घडल्याचा उल्लेख करत त्यांनी सर्व आंदोलकांवर आरोप नसल्याचे
सांगितले. अनेक विद्यार्थी प्रामाणिकपणे आंदोलन करत होते, मात्र
काही समाजकंटकांनी आंदोलनाचे स्वरूप बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी
केला.