आषाढी वारी २०२६ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंढरपुरातील वारकरी सुविधांची पाहणी
पंढरपूर : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध सुविधा आणि व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. पत्रा शेड येथील रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपात दर्शनासाठी उभ्या असलेल्या वारकऱ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःच्या हस्ते पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. तसेच भाविकांकडून उपलब्ध सुविधांबाबत अभिप्रायही जाणून घेतला.
यानंतर त्यांनी चंद्रभागा नदी परिसर आणि वाळवंटातील
स्वच्छतेची पाहणी केली. आरोग्य विभागाने उभारलेल्या वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन
केल्यानंतर होडीतून नदीपात्रातील स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी लाईफ जॅकेटसह
सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेऊन वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. भक्तीसागर परिसरातील आपत्कालीन
वैद्यकीय कक्षालाही त्यांनी भेट दिली. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची
विचारपूस करून डॉक्टरांशी चर्चा केली आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्याचे
निर्देश दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भक्तीसागर
परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सुरक्षित
साधनांचा वापर करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, नगराध्यक्ष प्रणिता भालके, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय
अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी
राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे तसेच संबंधित
अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, "आषाढी वारी निर्विघ्न पार पडावी आणि वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये
यासाठी शासन आणि प्रशासन २४ तास सज्ज असून सर्व यंत्रणा दक्षतेने काम करत
आहेत."