जंतर-मंतरवर 'चलो संसद' मोर्चात तणाव; आंदोलकांवर लाठीचार्ज, अनेक जण ताब्यात
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या
मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आयोजित 'चलो संसद'
मोर्चादरम्यान रविवारी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात तणावाचे वातावरण
निर्माण झाले. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही मोठ्या संख्येने आंदोलक
जंतर-मंतर येथे जमले होते. आंदोलकांनी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करत बॅरिकेड्स
हटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. गर्दी नियंत्रणात
आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात
घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर परिसरात सकाळपासूनच मोठा पोलीस
बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी
सुरक्षा कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. या
आंदोलनाद्वारे कॉक्रोच जनता पार्टीने परीक्षांतील कथित गैरप्रकार, पेपर
लीक प्रकरणे आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र
प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच परीक्षा व्यवस्थेत सुधारणा,
जबाबदारी निश्चित करणे आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने
निर्णय घेण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी आम आदमी पक्षाचे काही नेतेही आंदोलनस्थळी पोहोचले होते. मात्र
पोलिसांनी त्यांनाही पुढे जाण्यापासून रोखले. दरम्यान, CJPचे
मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा, अशी मागणी केली. "आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र सरकारकडून अद्याप
कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. आमचे आंदोलन आणि उपोषण सुरूच राहील,"
असे त्यांनी सांगितले.