पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; 'दोषींवर कठोर कारवाई होईल, राजकारण टाळा'
देशभरात गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी झालेल्या एनडीए संसदीय दलाच्या बैठकीत त्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत या संवेदनशील विषयावर राजकारण करू नये, असे आवाहन केले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, पेपर लीक प्रकरणात दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही आणि कठोर शिक्षा करण्यात येईल. तसेच पंतप्रधानांनी या मुद्द्याचे राजकारण न करण्यावर भर दिला. दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे आंदोलन पुन्हा सुरू झाले आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी संसद मार्चदरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि अत्याचार केल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा दावा करत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली. दीपके यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांचे उपोषण संपवण्याचा विचार सुरू होता. मात्र, संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर त्यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. एकीकडे केंद्र सरकारने दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले असताना, दुसरीकडे जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे पेपर लीक प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तापले आहे.