मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ५६ वा वाढदिवस; सोलापुरात एकाच दिवशी ५६ लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन

सोलापूर, दि. २० : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने २२ जुलै रोजी शहरभरात एकाच दिवशी ५६ लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सेवा आणि जनकल्याणाचा संकल्प पूर्ण करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहरातील सर्व भाजप मंडलांच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्यासोबत शालेय साहित्य वाटप, हृदयरोग तपासणी शिबिरे, भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप, वृक्षारोपण, प्रसाद वाटप, एसटी पास वितरण, आरोग्य शिबिरे, दिव्यांगांना ब्लँकेट वाटप, महिलांसाठी तुळशी रोप वाटप, गॅस वितरण, महाआरती, स्वच्छता अभियान, मनपा शाळांमध्ये वृक्षारोपण, महिलांसाठी लाठी-काठी प्रात्यक्षिक, शेतकरी महिलांना शेतीपूरक साहित्य वाटप, भारतमाता प्रतिमा वितरण, आयुष्मान कार्ड वाटप, कुष्ठरुग्णांना अन्नदान, रांगोळी स्पर्धा, नेत्र तपासणी, शालेय गणवेश वितरण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन व पर्यटन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

शहरभरात हे सर्व उपक्रम एकाच दिवशी आणि एकाच वेळी राबविण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, माजी महापौर श्रीकांचना यनम, सुधा अळीमोरे आणि ज्ञानेश्वर म्याकल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.