नीट पेपरफुटी आंदोलनाला WOW संघटनेचा पाठिंबा; विद्याताई लोलगे जंतर-मंतरवर सहभागी

नवी दिल्ली / सोलापूर, दि. २० : देशभरात गाजलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला WOW (वाव) संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई लोलगे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. परीक्षांमधील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या मागण्यांसाठी CJPच्या माध्यमातून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू असून, या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाला बळ देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलग १९ दिवस उपोषण केले. मात्र प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात असून, आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर WOW संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई लोलगे यांनी जंतर-मंतरवर उपस्थित राहून आंदोलनकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी विद्याताई लोलगे यांनी देशातील युवक, पालक आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.