सोनम वांगचुक प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला खडेबोल; "प्रत्येक व्यक्तीच्या जीवाची किंमत आहे"

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त करत प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान असून त्याचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, सोनम वांगचुक यांची दररोज डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी केली जात असून त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

यावर न्यायालयाने डॉक्टरांनी दररोज तपासणी सुरू ठेवावी आणि वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास तातडीने आवश्यक पावले उचलावीत, असे निर्देश केंद्र सरकारला दिले. न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की, "प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्याच्या सुरक्षेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे ही सरकारची जबाबदारी आहे." सोनम वांगचुक हे विविध मागण्यांसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या १९ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर पुढील सुनावणीदरम्यान न्यायालय परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे.