सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी कौशल्याधारित शिक्षणाची गरज : उद्योजक रघुनंदन लाहोटी
सोलापूर :- संगमेश्वर महाविद्यालय (स्वायत्त), सोलापूर येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने इकॉनॉमिक्स असोसिएशन २०२६-२७
चे उद्घाटन तसेच "औद्योगिक क्षेत्रातील युवकांसाठी आगामी रोजगाराच्या
संधी" या विषयावर जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या
व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मोहोरकर हे होते. प्रमुख
वक्ते म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक श्री. रघुनंदन लाहोटी यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या व्याख्यानात श्री. लाहोटी यांनी सोलापूरच्या
औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसमोर अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे
मांडले. त्यांनी सांगितले की, सोलापूरमध्ये वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, अन्नप्रक्रिया, नवीकरणीय
ऊर्जा आणि लघुउद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होत
आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी
उद्योगाभिमुख कौशल्ये, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संवाद कौशल्य, इंग्रजी भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे आवश्यक आहे.
युवकांनी नोकरी शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे
उद्योजक बनण्याचा दृष्टिकोन स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या
स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, स्किल
इंडिया यांसारख्या योजनांचा लाभ घेऊन उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. सोलापूर जिल्ह्याच्या भौगोलिक व औद्योगिक
क्षमतेचा योग्य उपयोग करून आधुनिक उद्योगांना चालना दिल्यास स्थानिक युवकांसाठी
मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय समारोपात डॉ. राजकुमार मोहोरकर यांनी
विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्य विकसित करून उद्योगविश्वातील बदलांना सामोरे
जाण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे
प्रास्ताविक डॉ. संगीता कामत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेश्मा शेख
यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन डॉ. अविनाश जम्मा यांनी
केले. तसेच अर्थशास्त्र विभागातील डॉ. संतोष मेटकरी डॉ. प्रवीण राजगुरू आणि डॉ.
युवराज सोलापुरे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.