मुलुंडमध्ये एसी लोकलचा श्वासच बंद! AC बंद पडल्याने दोन प्रवासी बेशुद्ध, रुग्णालयात दाखल

मुंबईतील मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये सोमवार सकाळी गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुलुंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी असलेल्या एसी लोकलची वातानुकूलन (AC) यंत्रणा अचानक बंद पडल्याने डब्यातील प्रवाशांचा श्वास कोंडला. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी असल्याने अवघ्या काही मिनिटांतच डब्यात उकाडा आणि कोंदट वातावरण निर्माण झाले. सर्व दरवाजे बंद असल्याने ताजी हवा आत येऊ शकत नव्हती. त्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

या घटनेदरम्यान एक महिला आणि एक पुरुष प्रवासी बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे. सहप्रवाशांनी तातडीने मदत करत बेशुद्ध झालेल्या महिलेला डब्याबाहेर आणले, तर प्रकृती बिघडलेल्या फहिम अन्सारी या प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तांत्रिक बिघाडानंतर संबंधित एसी लोकल पुढे कुर्ला स्थानकात रद्द करण्यात आली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)कडे जाणाऱ्या प्रवाशांची कुर्ला स्थानकात मोठी गर्दी झाली. ही लोकल टिटवाळा येथून सुटली होती. रेल्वे प्रशासनाने संबंधित एसी लोकल दुरुस्तीसाठी कार्यशाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला असून, तिच्या पुढील दोन फेऱ्या नॉन-एसी लोकल म्हणून चालविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.