श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या तयारीचा महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडून आढावा; वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा सज्ज करण्याचे निर्देश

आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याचे 18 जुलै 2026 रोजी सोलापूर शहरात आगमन होणार असून, पालखीचा शहरात दोन दिवस मुक्काम असणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाहणीची सुरुवात रूपाभवानी पाणी गिरणी चौक येथून करण्यात आली. त्यानंतर तुळजापूर वेस, कस्तुरबा मार्केट, सम्राट चौक, श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर, बाळी वेस, टेलिफोन भवन, कुंभार वेस, करण चौक मार्गे कुचन प्रशाला या पालखी मार्गाची तसेच मुक्कामस्थळाची पाहणी करण्यात आली.

यावेळी पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, अग्निशमन सुविधा, वाहतूक नियोजन आणि वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी आवश्यक सोयी-सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच मंगल कार्यालये आणि मोदी रेल्वे ब्रिज ते दमाणी नगर मार्गाचीही पाहणी करण्यात आली.

महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित विभागांना पालखी मार्गावरील अडथळे तातडीने दूर करणे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, स्वच्छता प्रभावीपणे राखणे आणि प्रकाश व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.  महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, अग्निशमन, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे. पालखी मार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करून वारकऱ्यांना सुरक्षित आणि सुकर सेवा देण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.