मीरा रोडवरील डालमिया शाळेला भीषण आग; ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि सभागृह जळून खाक
मुंबईजवळील मीरा रोड परिसरातील डालमिया शाळेत
बुधवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत शाळेच्या इमारतीच्या वरच्या
मजल्यावरील ग्रंथालय, सभागृह (ऑडिटोरियम), प्रयोगशाळा आणि अनेक वर्गखोल्या जळून
खाक झाल्या. मात्र, शाळा प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्व
विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर
काढण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास इस्कॉन मंदिराजवळील डालमिया शाळेच्या वरच्या मजल्यावर आग लागली. काही
वेळातच आगीने इमारतीचा मोठा भाग वेढला आणि काळ्या धुराचे प्रचंड लोट परिसरात
पसरले. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अग्निशमन
विभागाच्या प्राथमिक तपासानुसार, आग सर्वप्रथम ऑडिटोरियममध्ये
लागली आणि त्यानंतर सहाव्या मजल्यावरील बॅटरी बॅकअप रूमपर्यंत पसरली.
त्यामुळे या विभागांचे पूर्णपणे नुकसान झाले. याशिवाय ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या आणि ४ पाण्याचे टँकर घटनास्थळी
दाखल झाले. उंच मजल्यांवरील आग विझवण्यासाठी हायड्रॉलिक शिड्यांचा वापर करण्यात
आला. सुमारे ९० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
त्यानंतर पुन्हा आग भडकू नये म्हणून 'कूलिंग ऑपरेशन' सुरू ठेवण्यात आले.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन
विभागाने कूलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सखोल तपास करण्यात येणार असल्याचे
सांगितले आहे. आगीमुळे शाळेच्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संबंधित
यंत्रणांकडून इमारतीची संरचनात्मक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतरच शाळेची
इमारत वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.