मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; उभ्या डंपरला क्रेटा कारची धडक, 4 ठार, 2 गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात होऊन
चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील शांतीनगर परिसरातील रेस्ट हाऊसजवळ
ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कार (MH
01 CP 8021) गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. सकाळी सुमारे
7 वाजण्याच्या सुमारास चालकाचे
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला (MH
05 EL 3877) पाठीमागून जोरदार धडकली.
धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या
अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या
रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती
चिंताजनक असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या
प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य राबविण्यात आले. या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा
महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. लांजा पोलिसांनी घटनास्थळी
पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.