रायगडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीची अपहरणानंतर हत्या; 100 मीटरवर मृतदेह सापडला, संशयित अटकेत
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी
वाडी येथे पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची
हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून
नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी १३ जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता होती. मंगळवारी सकाळी
तिच्या बेपत्ता असल्याची माहिती मिळताच पेण पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.
विशेष शोध पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने परिसरातील शेत, झाडी
आणि इतर भागात कसून शोध घेण्यात आला.
शोधमोहीमेदरम्यान घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावरील
शेतात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. ही माहिती समोर येताच परिसरात मोठी खळबळ
उडाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला वेग दिला. घटनेची माहिती
मिळताच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल तसेच पेण पोलीस
ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा
घेतला.
तपासादरम्यान पोलिसांनी किरण भिकू वाघमारे (वय २४)
याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती
पोलिसांनी दिली असून त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय
न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलीचा
मृतदेह शवविच्छेदनासाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या
प्रकरणामागील कारण तसेच अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास
पोलिसांकडून सुरू आहे.