लातूरचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू; कारमध्ये आढळला मृतदेह

लातूर शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा बुधवारी संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी रोडवरील एम.जे. हॉस्पिटलचे संचालक असलेले डॉ. राठोड सकाळी सुमारे ११ वाजता घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर दुपारभर त्यांचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांनी त्यांचा शोध सुरू केला. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आंबेजोगाई रोड परिसरात त्यांच्या इनोव्हा कारमध्ये ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्राथमिक तपासात कारमध्ये गुंगीच्या औषधाच्या इंजेक्शनसह काही रिकाम्या औषधांच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी आत्मघाताचा संशय व्यक्त केला जात असला तरी काही जणांनी मृत्यूबाबत संशय उपस्थित केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे जप्त करण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून सर्व शक्य कोनातून तपास सुरू असून कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले जाणार आहेत. डॉ. मेहुल राठोड यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून रुग्ण आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.