विशेष मुलांकडून सीमेवरील सैनिकांसाठी राख्यांची अनोखी भेट; स्वगती शाळेत देशभक्तीपूर्ण रक्षाबंधन उत्साहात
सोलापूर : रोटरी रेडक्रॉस स्वगती शाळेच्या विशेष मुलांनी रक्षाबंधनानिमित्त भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्वतः तयार केलेल्या राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या. देशभक्ती आणि भावनिक वातावरणात हा अनोखा उपक्रम शुक्रवारी स्वगती शाळेच्या प्रांगणात पार पडला. कार्यक्रमाला ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे सीएचएम हरजीत सिंग, युवराज देसवले, राहुल धुमाळ, संगमेश्वर महाविद्यालयाच्या असोसिएट एनसीसी ऑफिसर कॅप्टन शिल्पा लब्बा, लेफ्टनंट तुकाराम साळुंखे तसेच स्वगती शाळेच्या अध्यक्षा गीता बालिगा उपस्थित होत्या.
विशेष मुलांनी सैनिकांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली
आणि सीमेवरील जवानांसाठी तयार केलेल्या राख्या सैन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द
केल्या. विद्यार्थ्यांच्या या भावनिक उपक्रमाचे उपस्थित अधिकारी आणि सैनिकांनी
मनापासून कौतुक केले. विशेष मुलींकडून राखी बांधून घेताना सैनिक आणि अधिकारीही
भारावून गेले. यावेळी सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी स्वगती शाळेत विशेष मुलांसाठी
राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांची माहिती घेत समाधान
व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संगमेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद
कुंटे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
संचालिका प्रा. तृप्ती बापट यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका जयश्री गुमास्ते, सचिवा ॲड. दीपाली मादगुंडी, खजिनदार प्रा. विशाखा
मराठे, सहसचिव पुरुषोत्तम कारकल, प्रा.
सुनिती बावचकर तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.