कार चालकावर गोळीबार; पाच आरोपींना केली अटक
सोलापूर : हैदराबाद रस्त्यावरील मुळेगाव परिसरात कार अडवून चालकावर गोळीबार
करून रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणात सोलापूर तालुका पोलिसांनी आणखी एका
आरोपीला अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता पाच झाली
आहे. याप्रकरणी कार चालक एजाज नबीलाल तांबोळी (वय
३७, रा. कर्णिकनगर) यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली होती. एजाज तांबोळी हे स्टील व्यापारी इब्राहिम मोतीवाला यांच्याकडे
चालक म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादीनुसार, दिवसभरातील वसूल
झालेली रक्कम घेऊन ते रात्री साडेनऊच्या सुमारास मुळेगाव येथे मालकाकडे जात असताना,
पाठीमागून कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांची कार अडवून त्यांच्यावर
दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला.
घटनेनंतर सोलापूर तालुका पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. यापूर्वी
चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढवत आणखी एका
संशयिताला अटक करण्यात आली. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, आरोपींकडून
अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक कुंदन गावडे
यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सहायक फौजदार विवेक
सांजेकर तसेच पोलीस अंमलदार राहुल महिंद्रकर, शशिकांत
कोळेकर, महेश कटकधोंड, धनराज गायकवाड
आणि अनंत चमके यांच्या पथकाने केली.