आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून अत्याधुनिक ड्रोनची तैनाती

आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पालखी मार्गावर अत्याधुनिक ड्रोनची तैनाती करण्यात आली. धर्मपुरी बॉर्डर ते नातेपुते या पालखी मार्गावर ड्रोनद्वारे संपूर्ण परिसरावर सतत नजर ठेवण्यात आली. या माध्यमातून पालखी सोहळ्याची रिअल-टाइम निगराणी करत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आली.

याशिवाय, पालखी मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात आला. वाहतूक कोंडी निर्माण होताच संबंधित यंत्रणांना तात्काळ सूचना देऊन वाहनांना पर्यायी मार्गावर वळवण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत झाली आणि पालखी सोहळा अधिक सुरक्षित, सुखकर व आरामदायी वातावरणात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी नियोजन केले. सोलापूर जिल्ह्यात पालखी प्रवेशापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरक्षा व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात आली असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी पोलीस दल सज्ज असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.