सोनम वांगचुक उपोषण सोडण्यास तयार; केंद्र सरकारसमोर ठेवल्या महत्त्वाच्या अटी
नीट पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र
प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषण
करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली
आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारसमोर काही
महत्त्वाच्या अटी मांडल्या आहेत.
रुग्णालयातून लिहिलेल्या पत्रात सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याचे केलेले आवाहन तसेच सरकारने काही मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याची भूमिका घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. वांगचुक यांनी आपल्या पत्रात नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्यासाठी संसदेत चर्चा व्हावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतही विचार व्हावा, अशी मागणी केली आहे.
तसेच, 20 जुलैच्या आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांविरोधात कोणतीही दंडात्मक अथवा सूडभावनेने कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट आणि बिनशर्त आश्वासन केंद्र सरकारने द्यावे, अशी अटही त्यांनी घातली आहे. वांगचुक यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी निष्पक्ष आणि उत्तरदायी शिक्षण व्यवस्थेची मागणी केली असून, त्याविरोधात कारवाई होऊ नये. सरकारने आंदोलनकर्त्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आश्वासन दिल्यास, लाखो विद्यार्थ्यांच्या आकांक्षांचा सन्मान झाल्याच्या विश्वासाने आपण उपोषण मागे घेण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.