राहुल गांधी, प्रणिती शिंदे यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी, खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या
इतर खासदारांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस कमिटीने
बुधवारी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. जंतर-मंतर येथे
पेपरफुटीविरोधात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर
झालेल्या पोलिस कारवाईचाही यावेळी निषेध करण्यात आला.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर
काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात
घोषणाबाजी करत जंतर-मंतरवरील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि
अश्रुधुराच्या वापराचा निषेध व्यक्त केला. तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र
प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी,
खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेणे ही
लोकशाहीसाठी धोकादायक बाब असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा
प्रयत्न होत असून लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक
अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले.
जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर झालेल्या
पोलिस कारवाईची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही
काँग्रेसने केली. या आंदोलनात माजी महापौर सुशीलाताई आबुटे, संजय
हेमगड्डी, आरिफ शेख, नगरसेवक नरसिंह
आसादे, प्रमिलाताई तुपलवंडे, गणेश
डोंगरे, तिरुपती परकीपंडला, शरद गुमटे
यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील
अन्यायाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी
तात्काळ राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांचा आवाज दडपून लोकशाहीचा आवाज बंद करता
येणार नाही."
— चेतनभाऊ नरोटे, अध्यक्ष, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी