नेत्रदीपक रिंगण व भावपूर्ण बंधुभेट; संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा बुधवारी पंढरपूर तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेश झाला. वारकऱ्यांच्या "माउली... माउली..." आणि "विठ्ठल... विठ्ठल..." च्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

वेळापूर येथून प्रस्थान केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूरबुवा समाधी येथे पारंपरिक नेत्रदीपक गोल रिंगण पार पडले. टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो वारकरी या सोहळ्याचे साक्षीदार झाले. यानंतर माळशिरस तालुक्याच्या हद्दीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्यांची बंधुभेट झाली. दोन्ही पालख्या समोरासमोर आल्यानंतर मानकऱ्यांनी परस्परांना मानाचा नारळ आणि प्रसाद अर्पण केला. या भावपूर्ण सोहळ्याने उपस्थित भाविक भारावून गेले.

बंधुभेटीनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोहोचली. दरम्यान, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी बोरगावहून मार्गस्थ होत तोंडले-बोंडले येथे दाखल झाली. "तुका म्हणे धावा... आहे पंढरीस विसावा" या अभंगाच्या गजरात वारकऱ्यांनी पारंपरिक धावा करत भक्तीचा उत्साह व्यक्त केला. त्यानंतर पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामी पोहोचली.  संतांच्या पालख्यांचे पंढरपूर तालुक्यात आगमन होताच प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे आणि गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी स्वागत केले.