कपडे बदलले, ट्रेन बदलली... तरीही पकडला! एक्स्प्रेसमधील हायटेक चोर सोलापुरातून जेरबंद
बिकानेर एक्स्प्रेसमधून लाखो रुपयांचे दागिने आणि सामान
चोरी करून कपडे बदलत रेल्वे बदलून पळून जाणाऱ्या एका सराईत चोराला रेल्वे सुरक्षा
बल (RPF) आणि जीआरपीच्या संयुक्त कारवाईत सोलापुरातून अटक करण्यात आली. आरोपीकडून
तब्बल ९.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात
आलेल्या आरोपीचे नाव राजन कुमार श्रीवास्तव (वय ५७) असे आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, २७ जून रोजी तडवळजवळ उभ्या असलेल्या बिकानेर एक्स्प्रेसच्या ए-२ डब्यातून एका
महिलेची ९.०५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या असलेली पर्स, तर ए-१ डब्यातून दुसऱ्या प्रवाशाची ५० हजार रुपयांची ट्रॉली बॅग चोरीला
गेली होती. घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल (RPF), गुन्हे
गुप्तचर शाखा आणि जीआरपीने संयुक्त तपास सुरू केला. सोलापूर रेल्वे स्थानकावरील
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित ट्रॉली बॅग आणि पर्स घेऊन उतरल्याचे दिसून आले.
त्यानंतर आरोपीने काही अंतरावर कपडे बदलले, पर्स लपवली आणि हुसेनसागर
एक्स्प्रेसने कलबुर्गीकडे पलायन केल्याचे तपासात उघड झाले.
तपासादरम्यान कलबुर्गी स्थानकावरील सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. तो
सोलापुरातील हिरा-मोती लॉज येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पुढे
आरोपी मुंबईला जाण्यासाठी राजकोट एक्स्प्रेस पकडणार असल्याची माहिती
पोलिसांना मिळताच सापळा रचण्यात आला. रेल्वे स्थानकाकडे जात असताना गांधी चौक
परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली
दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे रेल्वेतील चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा
यशस्वी उलगडा करण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे.