नीट पेपरफुटीनंतर MPSC औषध निरीक्षक भरतीवरही पेपरफुटीचे आरोप; ९० प्रश्न व्हॉट्सॲपवर व्हायरल, चौकशीची मागणी

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेबाबतही गंभीर आरोप समोर आले आहेत. परीक्षेतील १०० पैकी तब्बल ९० प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

या प्रकरणासंदर्भात काही स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर समोर आले असून, संबंधित प्रश्न औषध निरीक्षक भरती परीक्षेतील असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन उमेदवारांनी पुराव्यांसह महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या परीक्षेपूर्वीच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित झाली होती. तसेच काही उमेदवारांच्या गुणांमध्ये संशयास्पद वाढ झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील स्क्रीनशॉट्स २० मार्च रोजीच व्हायरल झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

याशिवाय प्रश्नपत्रिका मिळवून देण्यासाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याचाही आरोप करण्यात आला आहे. काही चॅट्समध्ये पाच लाख रुपयांची मागणी झाल्याचा दावा करण्यात आला असून, या संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करत भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे सांगितले आहे. आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची तथ्य पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे MPSC कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत ही बाब केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित नसून हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. परीक्षा प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण न देता कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.