‘एक घर–एक झाड’ मोहिमेला वेग; हरित एमआयडीसीसाठी ५ हजार वृक्षारोपणाचा संकल्प
सोलापूर शहर अधिक हरित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या
उद्देशाने सोलापूर ग्रीन मिशनच्या वतीने अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीत वृक्षारोपण
अभियान राबविण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात
मोठ्या संख्येने उद्योजक, लोकप्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमींनी
सहभाग घेतला. सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या
पुढाकाराने ‘एक घर – एक झाड’ ही मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत
शहरात तब्बल ५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानाचा भाग
म्हणून रविवारी अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या
कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम,
नगरसेवक ज्ञानेश्वर म्याकल, नगरसेवक
सत्यनारायण गुर्रंम, नगरसेवक विजय चिप्पा, नगरसेवक श्रीनिवास दायमा, उद्योजक निलेश फोफलिया,
काशिनाथ गड्डम, यलप्पा गड्डम तसेच विविध
क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढते तापमान,
पर्यावरणाचा ऱ्हास आणि शहरातील घटते हरित क्षेत्र याबाबत चिंता
व्यक्त केली. डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी हाती घेतलेले वृक्षसंवर्धनाचे कार्य
शहरासाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना डॉ.
सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की, सोलापूर शहरातील तापमान
सातत्याने वाढत असून त्यावर वृक्षारोपण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. ‘एक घर – एक
झाड’ मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होईल आणि
शहर अधिक हरित तसेच प्रदूषणमुक्त करण्यास मदत मिळेल. या उपक्रमामुळे औद्योगिक
परिसरात हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक
महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.