खळबळजनक! लोकप्रिय रीलस्टार रोहिणी पाराध्येची आत्महत्या; स्वतःच्या हॉटेलमध्ये गळफास
सोशल मीडियावरील आपल्या साध्या, मनमोकळ्या आणि हसऱ्या रील्समुळे लोकप्रिय झालेल्या रीलस्टार रोहिणी नीलेश
पाराध्ये (वय २५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा
तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली आहे. मंगळवारी दुपारी साडेदोनच्या सुमारास ही
घटना उघडकीस आली. रोहिणी पाराध्ये या “हॉटेल ग्रामपंचायत”च्या मालकीण होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या स्वयंपाकघरातील लोखंडी
अँगलला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच पती नीलेश
पाराध्ये यांनी त्यांना तत्काळ मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र,
डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
रोहिणी आणि त्यांचे पती नीलेश पाराध्ये हे दाम्पत्य
गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण जीवनशैली, सामाजिक विषय आणि खाद्यसंस्कृतीवर आधारित
रील्समुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत होते. त्यांच्या व्हिडिओंना
मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.
कायम आनंदी आणि उत्साही दिसणाऱ्या रोहिणी यांच्या अचानक
निधनामुळे सोशल मीडियासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पती
नीलेश पाराध्ये यांनी पोलिसांना माहिती दिली असून मंगळवेढा पोलीस पुढील तपास करत
आहेत.