पत्र्यावरून पडल्याचा दावा, पण अहवालात समोर आलं वेगळंच सत्य; चिमुकल्याच्या मृत्यूने खळबळ

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर येथे पाच वर्षीय मुलाच्या मृत्यूच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला मुलगा पत्र्यावरून पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या निष्कर्षांमुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. मृत मुलाचे नाव समर्थ यल्लाप्पा कास्तार (वय ५) असे असून तो मूळचा विजयपूर जिल्ह्यातील अंजूटगी गावचा रहिवासी होता. सध्या तो बरुर येथे आपल्या आजीसोबत राहत होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास समर्थ घरातून बाहेर गेला होता. काही वेळानंतर त्याचा काका अंकुश कास्तार याने त्याला बेशुद्ध अवस्थेत घरी आणत पत्र्यावरून पडल्याचे सांगितले.

कुटुंबीयांनी तत्काळ समर्थला उपचारासाठी सोलापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. यानंतर पोलिसांनी संशयाच्या आधारे मुलाचा काका अंकुश परसाप्पा कास्तार (वय २५) याला ताब्यात घेतले आहे.

घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मुलाची आजी शोभा बगले यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीने चिमुकल्याची हत्या का केली, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे.