महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या थारचा भीषण अपघात; मोठी दुर्घटना टळली, पैलवान बालंबाल बचावला

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुस्तीपटू आणि सिकंदर शेख  यांच्या गाडीचा सांगोला-मिरज मार्गावर भीषण अपघात झाला. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या या अपघातात थार गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने सिकंदर शेख यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, काही कामानिमित्त प्रवास करत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की थार गाडीचा पुढील आणि बाजूचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त झालेली थार गाडी सिकंदर शेख यांना एका प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धेतील विजयाबद्दल बक्षीस म्हणून मिळाली होती. त्यामुळे या अपघाताची चर्चा कुस्तीप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि सिकंदर शेख यांचे चाहते घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार रस्त्यावरील परिस्थिती आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे.

सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरीसह अनेक प्रतिष्ठेच्या कुस्ती स्पर्धांमध्ये यश मिळवत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अपघाताच्या वृत्तानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ते सुरक्षित असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.