अधिक मासात जावयाला अनोखी भेट! सासऱ्याने दिली सिंधी जातीची घोडी; धाराशिवमध्ये चर्चेला उधाण

राज्यभरात अधिक मास अर्थात धोंड्याच्या महिन्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. या महिन्यात जावयाला सासरवाडीकडून विशेष मानपान दिले जाते. जावयासाठी खास भोजन, औक्षण आणि भेटवस्तू देण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. मात्र धाराशिव जिल्ह्यात एका सासऱ्याने आपल्या जावयाला दिलेल्या अनोख्या भेटीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील पारा येथील विलासराव झांबरे यांनी आपल्या जावई वकील क्रांतीसिंह राऊत यांना अधिक मासानिमित्त सिंधी जातीची घोडी भेट दिली आहे. महागाई, वाढते पेट्रोल-डिझेल दर आणि पारंपरिक धोंडे जेवणाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या या आगळ्यावेगळ्या भेटीने उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मिळालेल्या माहितीनुसार, ईट येथील वकील क्रांतीसिंह राऊत यांचा विवाह कोरोनापूर्वी पारा येथील विलासराव झांबरे यांच्या मुलीसोबत झाला होता. मात्र कोरोना काळात अधिक मास आल्याने सासऱ्यांना जावयाची हौस पूर्ण करता आली नव्हती. यंदा अधिक मास सुरू होताच त्यांनी खास तयारी करत केज तालुक्यातील साळेगाव येथून सलमान खान यांच्या माध्यमातून सिंधी जातीची घोडी आणली.

धोंडे जेवणाच्या कार्यक्रमानंतर जावई क्रांतीसिंह राऊत यांना ही घोडी भेट स्वरूपात देण्यात आली. जावयाला घोड्यांची विशेष आवड असल्याचे सासऱ्यांना माहिती होते. त्यामुळे ही भेट त्यांच्यासाठी खास ठरली आहे. क्रांतीसिंह राऊत हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेती करत असून ते आता या घोडीवर बसून शेतात जात असल्याचे सांगितले जात आहे. “पेट्रोलपेक्षा घोडीच परवडली,” अशा प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. या अनोख्या भेटीमुळे धाराशिव जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली असून घोडी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. वाढत्या इंधन दरांच्या काळात पारंपरिक आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचे हे वेगळे उदाहरण म्हणूनही या घटनेकडे पाहिले जात आहे.