महाराष्ट्रात अपघातांची रात्र; धुळ्यात भीषण तिहेरी अपघातात ५ ठार, २८ जखमी

महाराष्ट्रात सोमवारी पहाटे अपघातांची मालिका पाहायला मिळाली. धुळे शहरानजिक असलेल्या लळिंग घाटात दोन वाळू वाहतूक करणारे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स बस यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून २८ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळावरून एकूण ३३ जणांना तातडीने धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी ५ जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. मृतांपैकी ट्रक चालक मनोज प्रकाश नरव्हाळ यांची ओळख पटली असून ते मालेगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित चार मृतांची ओळख पटविण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. या अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या २८ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी रात्री महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातही भीषण अपघात झाला होता. एक स्कॉर्पिओ गाडी सुमारे ९०० फूट खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या सलग दुर्घटनांमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.