महापालिकेच्या स्टोअरची महापौरांकडून पाहणी; सुरक्षा आणि नोंद व्यवस्थेबाबत कडक सूचना
सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभागाच्या स्टोअर तसेच अतिक्रमण विभागाच्या स्टोअरची आज महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्टोअरमधील सुरक्षा व्यवस्था, साहित्याची साठवणूक, वाहनांची ये-जा नोंद प्रणाली आणि प्रशासनिक कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. या पाहणीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अक्कूलवार, नियंत्रणाधिकारी तपन डंके यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देताना सांगितले की, स्टोअर परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व व्यक्तींची स्वतंत्र मस्टर नोंद ठेवण्याची व्यवस्था तातडीने सुरू करण्यात यावी. तसेच स्टोअर परिसरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांचीही स्वतंत्र नोंद ठेवली जावी, असे निर्देश त्यांनी दिले. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहून आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
महापौरांनी स्टोअरमधील व्यवस्थापन अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्यावर भर देत नियमित तपासणी आणि देखरेख करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “महानगरपालिकेची प्रत्येक मालमत्ता, साहित्य आणि कार्यालयीन व्यवस्था ही जनतेची संपत्ती आहे. त्यामुळे तिचे संरक्षण, योग्य देखभाल आणि पारदर्शक नोंद प्रणाली अत्यंत महत्त्वाची आहे. सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.” तसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही, मस्टर नोंद आणि नियमित नियंत्रण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.