मुंबई विमानतळावर ३.१५ कोटींच्या सोन्याची मोठी जप्ती; दुबईहून आलेले दोन प्रवासी अटकेत

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत दुबईहून आलेल्या दोन प्रवाशांकडून तब्बल ३.१५ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात आली असून सीमाशुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. पहिल्या प्रकरणात, दुबईहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाची तपासणी करताना अधिकाऱ्यांना संशय आला. सखोल झडतीदरम्यान त्याच्याकडील सिगारेटच्या पाकिटांमध्ये लपवून ठेवलेले सोन्याच्या पेस्ट स्वरूपातील पदार्थ आढळून आले. तपासानंतर हे १.०२ किलो वजनाचे सोने असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची अंदाजे किंमत १.४१ कोटी रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यानंतर दुसऱ्या कारवाईत आणखी एका प्रवाशाकडून २४ कॅरेटचे १.२५७ किलो कच्चे सोने जप्त करण्यात आले. हा आरोपी फायनान्शियल सेक्टरमध्ये कार्यरत असून उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे. या सोन्याची किंमत सुमारे १.७४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दोन्ही आरोपींना सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत अमेरिकन-इराण संघर्ष आणि दुबईमधील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशातील मालमत्ता भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान कर आणि आर्थिक नियम टाळण्यासाठी सोन्यात रूपांतर करून तस्करीचा मार्ग अवलंबल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास सीमाशुल्क विभाग करत आहे. मुंबई विमानतळावरील या कारवाईमुळे पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आला असून, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा गैरफायदा घेत भारतात बेकायदेशीर मार्गाने संपत्ती आणण्याचे प्रकार वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.