ऑनलाइन औषध विक्रीविरोधात सोलापुरात औषध विक्रेत्यांचा बंद; चार हजार मेडिकल दुकाने बंद

सोलापूर : ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात आज सोलापूरसह देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पुकारला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात औषध विक्रेत्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. सोलापुरातील चार हुतात्मा स्मारक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढण्यात आला असून, पुढे पूनम गेट परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदमध्ये सोलापुरातील जवळपास चार हजार मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आल्याची माहिती औषध विक्रेत्यांकडून देण्यात आली. ऑनलाइन औषध विक्रीमुळे स्थानिक मेडिकल व्यवसायावर मोठा परिणाम होत असून, ग्राहकांची संख्या कमी होत असल्याची भावना औषध विक्रेत्यांनी व्यक्त केली. ऑनलाइन माध्यमातून औषध विक्रीवर नियंत्रण आणावे, स्थानिक विक्रेत्यांचे हित जपावे आणि औषध वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता राखावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनाबाबत अधिक माहिती बसवराज मनोरे आणि व्यंकटेश पुजारी यांनी दिली.