‘कॉकरोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर चर्चा; अवघ्या तीन दिवसांत हजारोंचा प्रतिसाद
सोशल मीडियावर सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) नावाच्या एका अनोख्या आणि व्यंगात्मक ‘राजकीय पक्षाची’ जोरदार चर्चा सुरू
आहे. हा प्रत्यक्षात कोणताही अधिकृत राजकीय पक्ष नसून सोशल मीडियावरील व्यंगात्मक
मोहीम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अवघ्या तीन
दिवसांत ७० हजारांहून अधिक लोक या मोहिमेशी जोडल्याचा दावा करण्यात येत आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके
यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्मवर हे हँडल सुरू केले आहे. त्यांनी
यापूर्वी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ पक्षाच्या सोशल मीडिया मोहिमेत
काम केल्याची माहिती समोर आली आहे.
या हँडलच्या बायोमध्ये “तरुणांसाठी आणि तरुणांद्वारे” अशी
भूमिका मांडण्यात आली असून, बेरोजगार युवक, परीक्षांमधील
वाद, पारदर्शकतेचे प्रश्न आणि व्यवस्थेविरोधातील नाराजी या
मुद्द्यांना व्यंगात्मक शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पार्टीत सामील होण्यासाठी हटके अटी
या ‘पक्षात’ सामील होण्यासाठीही मजेशीर अटी ठेवण्यात
आल्या आहेत. बेरोजगार आणि ‘आळशी’ असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दिवसातून किमान ११ तास ऑनलाईन सक्रिय असणाऱ्यांना सदस्यत्व देण्याचा उल्लेख सोशल
मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
जाहीरनामाही व्हायरल
‘कॉकरोच जनता पार्टी’ने आपला जाहीरनामा
देखील प्रसिद्ध केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलांना ५० टक्के
आरक्षण, मीडिया आणि न्यूज अँकर्सची जबाबदारी निश्चित करणे,
निवृत्तीनंतर सरन्यायाधीशांना राज्यसभेवर नियुक्ती न देणे, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई अशा विविध मागण्या या
जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.
वादाची सुरुवात कशी झाली?
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान केलेल्या कथित विधानानंतर हा वाद
सुरू झाला. बेरोजगार तरुण, पत्रकारिता, RTI कार्यकर्ते
आणि वकिली क्षेत्रातील काही लोकांची तुलना “कॉकरोच” आणि “परजीवी” यांच्याशी
केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर अनेकांनी संताप व्यक्त
केला.
मात्र, नंतर सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देत
आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे सांगितले. त्यांचा उद्देश
बेरोजगार युवकांवर टीका करण्याचा नसून ‘बनावट पदवीधारकां’वर भाष्य करण्याचा होता,
असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भारताच्या युवा शक्तीबद्दल अभिमान
असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर
सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे नाव ट्रेंड होऊ लागले असून, व्यंगातून तरुणांच्या नाराजीला अभिव्यक्ती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.