जेलरोड परिसरात महापालिकेची कारवाई; पार्किंग जागेतील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने जेलरोड परिसरातील एका इमारतीवर अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई करण्यात आली. संबंधित इमारतीच्या पार्किंगसाठी राखीव जागेत बेकायदेशीरपणे बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने ही कारवाई केली. महापालिकेकडून शहरातील मोठ्या इमारतींमध्ये पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांचा व्यावसायिक अथवा इतर अनधिकृत वापर रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत जेलरोड परिसरातील संबंधित इमारतीची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आले. यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी जाऊन संबंधित बांधकाम पाडण्याची कारवाई केली. कारवाईदरम्यान महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या कारवाईची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. महापालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.