श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाहणी; आधुनिक सुविधांचे आश्वासन

सोलापूर शहरातील श्री मार्कंडेय जलतरण तलावाच्या दुरावस्थेबाबत जलतरणपटू, त्यांचे पालक आणि सभासदांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडेय जलतरण तलावाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी त्यांनी जलतरणपटू, प्रशिक्षक, पालक, सभासद आणि नागरिकांशी संवाद साधत तलावातील विविध अडचणी जाणून घेतल्या. जलतरणपटूंनी स्वच्छतागृहांची दुरावस्था, चेंजिंग रूमची खराब अवस्था, रंगरंगोटीची आवश्यकता, काही बाथरूमना दरवाजे नसणे, फुटलेल्या टाईल्स, सोलर सिस्टीमची गरज, पार्किंग परिसराचे काँक्रिटीकरण आणि प्रेक्षक गॅलरीसाठी शेड उभारण्याची मागणी केली. तसेच जलतरण तलावातील वाढीव दर रद्द करून पूर्वीप्रमाणे वार्षिक, पंचवार्षिक आणि दशवार्षिक पास योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. लवकरच राज्यस्तरीय स्पर्धा होणार असून उन्हाळी सुट्टीमुळे अनेक शिकाऊ विद्यार्थी तलावात येत असल्याने खेळाडूंना नियमित सराव करताना अडचणी येत असल्याचे पालकांनी सांगितले. या सर्व समस्यांवर सकारात्मक भूमिका घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी जलतरणपटूंना अधिक चांगल्या सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. श्री मार्कंडेय जलतरण तलावातील दुरावस्था दूर करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. युवकांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी शहरात आधुनिक क्रीडा सुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. योग्य सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास गुणवंत खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा विभागातील अधिकारी, संबंधित कर्मचारी, जलतरणपटू, त्यांचे पालक आणि सभासद उपस्थित होते.