महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सोलापूर महापालिकेत आढावा बैठक संपन्न
सोलापूर -- महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबईचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. शेरसिंग
रुक्कानसिंग डागोर यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त आज सोलापूर महानगरपालिका येथे
सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या
बैठकीत लाड-पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे प्रलंबित प्रकरणे, त्यावर करण्यात आलेली कार्यवाही तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व
त्यांचे निराकरण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान मा. अध्यक्ष
श्री. डागोर यांच्यासोबत झालेल्या
बैठकीतही सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मांडल्या. कर्मचाऱ्यांच्या आरोग्य,
निवारा व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याची
आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेतील बैठकीत बोलताना मा. श्री.
डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था, त्यांच्या
मुलांच्या शिक्षणाची सोय तसेच संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत
महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “सोलापूर शहराची स्वच्छता राखण्यासाठी दिवस-रात्र
परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनाने
प्राधान्याने घ्यावी,” असे त्यांनी नमूद केले.
अलीकडील काळात सफाई कर्मचाऱ्यांमध्ये वाढत्या आरोग्य
समस्यांकडे लक्ष वेधताना त्यांनी विशेषतः महिला कर्मचाऱ्यांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, दम्याचा त्रास व इतर गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आणून
दिले. या पार्श्वभूमीवर महापालिकेअंतर्गत कार्यरत सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी
त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह पाच लाख रुपयांपर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा लागू
करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
तसेच कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध सोयी-सुविधांचा योग्य
लाभ मिळावा, यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या
सूचना देण्यात आल्या. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलींना सायकली उपलब्ध करून देणे,
मुलांना विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणे, अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांवरही भर देण्यात आला.
यावेळी महापालिकेच्या वतीने लाड-पागे समितीअंतर्गत ३७
जागांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या २०२३ च्या सुधारित शासन निर्णयानुसार
उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये १३ पदे
कनिष्ठ श्रेणी लिपिक, २ पदे कनिष्ठ अभियंता तसेच उर्वरित पदे
सफाई कामगार म्हणून देण्यात आली.
मा. अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर यांच्या हस्ते संबंधित
उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. या प्रक्रियेबद्दल त्यांनी
महापालिकेचे कौतुक केले. तसेच लाड-पागे समितीअंतर्गत प्रलंबित अर्ज लवकरात लवकर
निकाली काढावेत आणि जुन्या प्रलंबित अर्जांची प्रतीक्षा यादी व नवीन अर्जांची
प्रतीक्षा यादी स्वतंत्र ठेवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त सोनाली यादव,
मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, मुख्यलेखा
परीक्षक सदानंद वाघमारे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले,
सहायक आयुक्त गिरीष पंडित, सहायक आयुक्त मनीषा
मगर, नगर अभियंता सारिका अक्कूलवार, कार्यकारी
अभियंता राजेश परदेशी, कामगार नेते बाली मंडेपू, श्रीनिवास रामगल यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी
उपस्थित होते.