पंजाबमध्ये सलग दोन स्फोटांनी खळबळ; तीन तासांत दोन शहरांत धमाके

पंजाब मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून मंगळवारी रात्री अवघ्या तीन तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेल्या स्फोटांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. पहिला स्फोट जालंधर येथे सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर झाला, तर दुसरा स्फोट अमृतसर येथील लष्करी छावणी परिसरात झाला.

पहिला स्फोट (रात्री ८:००):
जालंधरमधील बीएसएफ मुख्यालयाबाहेर एका डिलिव्हरी स्कूटीमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज सुमारे एक किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या घटनेत बीएसएफचा एक सहाय्यक उपनिरीक्षक जखमी झाला असून स्कूटीचा पूर्णतः चक्काचूर झाला. स्फोटाचे कारण पार्सल बॉम्ब की हल्ला, याचा तपास सुरू आहे.

दुसरा स्फोट (रात्री १०:५०):
जालंधरमधील घटनेनंतर काही तासांतच अमृतसरमधील लष्करी छावणी परिसरात दुसरा स्फोट झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

तपास यंत्रणा सतर्क

या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) चे पथक पंजाबमध्ये दाखल झाले आहे. बॉम्ब शोधक पथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञ घटनास्थळी तपास करत आहेत. दहशतवादी कटाच्या कोनातून तपास सुरू असून गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.