घरातून हाकललं, पत्नीने साथ सोडली; मिरा रोड प्रकरणातील आरोपीच्या भूतकाळाचा धक्कादायक खुलासा
मिरा रोड येथे घडलेल्या हल्ल्याने राज्य हादरले असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी जैब जुबैर याच्या आयुष्याबाबत महत्त्वाची
माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैब हा
उच्चशिक्षित असून त्याने अमेरिकेत शिक्षण घेतले होते. त्याचे कुटुंबीय सध्या
अमेरिकेत स्थायिक आहेत. मात्र, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक
मतभेदांमुळे त्याला घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याची पत्नीनेही साथ
सोडल्याने तो पूर्णपणे एकाकी पडला. यानंतर तो कुर्ला परिसरात राहू लागला. येथेही
त्याला घर मिळण्यात अडचणी आल्या. या अनुभवांमुळे त्याच्या मनात समाजाबद्दल
नकारात्मक भावना निर्माण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. एकाकीपणातून
त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला. याच काळात तो कट्टरपंथी विचारसरणीशी संबंधित
व्हिडिओ आणि भाषणांकडे आकर्षित झाला. तपास यंत्रणांच्या मते, तथाकथित “लोन वुल्फ” हल्ल्यांच्या व्हिडिओंमधून प्रेरणा घेत त्याने मिरा
रोड हल्ल्याचा कट रचला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात
आहे.